Sharad Pawar on Balasaheb Thorat || पहा काय म्हणाले शरद पवार बाळासाहेब थोरातांबद्दल.

बाळासाहेब थोरातांना आता निर्णय घेण्याचे अधिकार द्यायला हवेत – शरद पवार

Sharad Pawar on Balasaheb Thorat

Shirdi: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. सगळ्याच पक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या उमेदवारांसाठी राज्यात दहा सभा घेतल्या असून काल त्यांची मुंबई मध्ये शेवटची प्रचार सभा झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी या नेत्यांच्या पण सभा सुरु आहेत. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार व अजित पवार यांच्या पण जोरदार प्रचार सभा व दौरे सुरु आहेत .

शरद पवार त्यांचा मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राचा प्रचार दौरा पूर्ण करून आता पश्चिम महाराष्ट्रात आपला प्रचार सुरु करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा गढ समजला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेने च्या फुटीनंतर होणारी हि पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या साठी पक्ष अस्तित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. तसेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पक्ष चालवण्याच्या दृष्टीने निवडणूक महत्वाची आहे. एकूणच महाविकास आघाडीसाठी सत्ता वापसी च्या दृष्टीने तर महायुतीसाठी सत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्वाची समजली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघांमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे सामील होत आहे व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार फटकेबाजी करत भाषण करत आहेत. काल शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेसाठी बाळासाहेब थोरात व शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. या सभेमध्ये उमेदवार प्रभावती घोगरे यांनी आपल्या भाषणामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्याचे कारण सांगत असताना मी एक गृहिणी आहे, एक शेतकरी कुटुंबातील महिला आहे तसेच राजकीय वारसा असलेली एक महिला आहे हे सांगत असताना मी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडनुकी मध्ये मी पहिल्यांदा भाषण केले. त्यानंतर नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सध्याचे खासदार निलेश लंके यांच्या प्रचारामध्ये मला भाषण करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून प्रभावती घोगरे या नगर जिल्ह्याला व संबंध महाराष्ट्राला माहीत झाल्या यातूनच राहता विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याकडे विधानसभेची निवडणूक लढण्याची मागणी केली त्यानंतर मी ही मतदारसंघातील दहशत संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला अशा पद्धतीने मी ही उमेदवारी करत आहे. पुढे त्या बोलल्या या तालुक्यात असलेली दहशत संपवुन या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी ही उमेदवारी करत असल्याच सांगितलं. पुढे त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न, विविध ठिकाणी पाट चाऱ्यांचा प्रश्न, दुध दराचा प्रश्न, शिर्डी साई बाबा संस्थान मधील कामगारांचा प्रश्न, साई बाबा मंदिरातील फुलांचा प्रश्न तसेच विविध रस्त्यांचा प्रश्न अशी विविध प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडले व यानंतर त्यांनी बाळासाहेब थोरात, शरद पवार व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून हे सर्व प्रश्न आगामी काळात निवडून आल्यानंतर सोडवण्यासाठी मदतीचा शब्द घेतला.

आपल्या भाषणामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असून, या मतदार संघामधील शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादकांचे प्रश्न, फुल उत्पादकांचे प्रश्न, शिर्डी संस्थान मधील कामगारांचे प्रश्न तसेच निळवंडे पात पाण्याचे प्रश्न सोडवायचे असल्याचे सांगितलं. एकूणच या मतदारसंघांमध्ये विविध व्यवसाय, उद्योगधंदे सुरू व्हावेत या दृष्टीने प्रयत्न करायचे असल्याचे सांगितले. आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिले तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सर्व मदत होईल असे त्यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगितले. त्यामुळे येणाऱ्या २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन बाळासाहेब थोरातांनी केले. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी बालपणी शिकायला असतानाचा राहता तालुका कसा होता, त्यावेळी असलेले पाणी, त्यावेळी असलेली सुबत्ता असलेल्या पेरूच्या बागा याबद्दल बोलले. आता राहता तालुक्यामधून संपत चाललेली पेरूचे क्षेत्र ही चिंतेजी बाब असून या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळवून देणारी शेती कमी होत असल्याचं त्यांनी मत मांडलं. या सर्व बाबींमध्ये बदल होणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सत्तेत आलं पाहिजे; पण सत्तेत येण्यासाठी आमदार हा आपल्या विचारांचा असला पाहिजे यासाठी तुम्ही आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असं त्यांनी आवाहन केलं. पुढे जाऊन ते बोलले की मी काय आता विधानसभेला उभा नाही; त्यामुळे आपल्याला बाळासाहेब थोरात यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. हे राज्य जर त्यांच्या हातात दिले तर विविध प्रश्न सुटू शकतात असे मत शरद पवार यांनी मांडले.

शरद पवारांचे भाषणादरम्यानच हे मत ऐकून उपस्थित असलेल्या व महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केल्या बाबतची कुजबूज सुरू आहे. तसेच पाठीमागील काळात संगमनेरला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव माजी मंत्री अमित देशमुख हे युवा निर्धार मेळाव्याला आले असताना त्यांनी सांगितलं होतं, की मी अशीच युवा संवाद यात्रा केली होती व तेंव्हा माझे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी तालुक्यामध्ये युवा संवाद यात्रा केली तर मला या ठिकाणी तसंच काहीतरी घडताना दिसतय असं सूचक वक्तव्य केलं होतं. तेंव्हापासूनच बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत मुख्यमंत्री पदा बाबतच्या चर्चा जास्त प्रमाणात सुरु झाल्या आहेत. कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि गांधी,नेहरूंच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री पद मिळते का ते आगामी काळात पाहण महत्वाच राहिलं.